मास्क न वापरणाऱ्यांकडून काटेकोरपणे दंड वसूल करा


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
शनिवारी त्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, येथील जिल्ह्यांच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला तसेच माझे कुटुंब , माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करा यासाठी सुचना केल्या. आज औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
दंड वसुली काटेकोरपणे व्हावी
जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकांना औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक, जालनाचे पालकमंत्री राजेश टोपे, लातूर पालकमंत्री अमित देशमुख, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंढे, अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नंदुरबार पालकमंत्री के सी पाडवी, धुळेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त यांची देखील उपस्थिती होती.
मुंबईहून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव राव आदि उपस्थित होते.

 349 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.