केडीएमसी लवकरच उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली माहिती

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आय.एम.ए. कल्याण व डोंबिवली यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर लवकरच उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी दिली. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात कल्याण डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
कोविड पॉझिटीव्ह रुग्ण कोविड निगेटिव्ह म्हणजे कोरोनामुक्त झाला तरी कित्येक वेळा त्यांच्या फुफुसांमध्ये इन्फेक्शन राहते, अशा रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यावर देखील बाहेरुन ऑक्सिजन दयावा लागतो आणि काळजी न घेतल्यास सदर रुग्णांची प्रकृत्ती गंभिर होऊ शकते, अशा रुग्णांसाठी महापालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार आहे. जेणे करुन अशा कोरोनामुक्त रुग्णांना तेथे ठेऊन त्यांचेवर फिजीओथेरेपी व अन्य उपचार करुन त्यांची प्रकृत्ती लवकर सुधारु शकेल.
सदर मिटींगमध्ये या विषाणूच्या उपचारासाठी काय कार्यपध्दती अवलंबवावी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या बाबींवर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावर ताप हे केवळ कोरोनाचे लक्षण नाही,अशक्तपणा, जुलाब अशी अनेक लक्षणे कोरोनामध्ये दिसून येत आहेत, त्यामुळे अशा रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करुन घेणे गरजेचे आहे, असा मुद्दा तज्ञ डॉक्टरांनी मांडला. लक्षणे नसणा-या रुग्णांनी (नातेवाईकांनी/ हायरिस्क पेशंट) कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होईल असाही मुद्दा या चर्चेत मांडण्यात आला.
कोरोना चाचण्यांची वेळ वाढविल्यास अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल, असा मुद्दा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मांडल्यावरती महापालिका कोरोना चाचण्यांची वेळ सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. एन.ए.बी.एल. ची मान्यता असलेल्या खाजगी लॅबनी महापालिकेकडे विचारणा केल्यास त्यांनाही ॲन्टीजेन टेस्टसाठी परवानगी मिळवून देऊ, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.
टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांना मार्गदर्शन करावे तसेच सदर केंद्रांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केली.
या बैठकीत टास्क फोर्स‍ टिमच्या वतीने विक्रम जैन, डॉ. राजेंद्र केसरवानी, डॉ. अमित सिंग, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अर्चना पाटे, डॉ. प्रशांत पाटील आणि साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर, डॉ. विनोद दौंड यावेळी उपस्थित होते.

 488 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.