पत्रकारितेतील आधारवड हरपला
ठाणे ः येथील साक्षेपी पत्रकार आणि बहुआयामी लेखक श्रीकांत वामन नेर्लेकर उर्फ गुरुजी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. गेले काही दिवस कोविडमुळे आजारी होते. डोक्याला तीव्र दुखापत झाल्याने उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
तरूणांना लाजवेल असे त्यांचे अफाट व्यक्तिमत्त्व होते. अखंड ज्ञानसेवक, अजातशतू, स्थितप्रज्ञ, ध्येयवादी, समन्वयवादी, निरलस पत्रकार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व , चिंतनशील पत्रकार आणि बहुआयामी लेखक अशा बिरुदांनी ते ओळखले जात. १९५४ पासून हाती घेतलेले पत्रकारितेचे व्रत त्यांनी तब्बल ६६ वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवले होते. ते मूळचे कुरडुवाडी, सोलापूरचे. विद्यार्थीदशेत रामभाऊ म्हाळगी, काका महाजनी यांच्या सानिध्यात संस्करांचे धडे घेतले. पत्रकारिता ही विधायकच असली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता . आणि या वाटेवरूनच त्यांनी अखंड पत्रकारिता केली. दैनिक तरुण भारत ठाणे वार्ताहर म्हणून त्यांनी पत्रकरितेला सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, पुण्यनगरी, सन्मित्र, नवशक्ती, ठाणे वैभव, सागर, अशा विविध दैनिकातून त्यांची पत्रकारिता बहरली. प्रसंगोदभव लिखाण हा त्यांच्या लेखनाचा पैलू होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अनेक वर्षे सदस्य व पदाधिकारी या नात्याने काम केले.
येथील व्यास क्रिएशन्स् प्रकाशन सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. व्यास क्रिएशन्स् प्रकाशित प्रतिभा दिवाळी अंक, चैत्रपालवी विशेषांक यांचे संपादकत्व त्यांनी भूषवले. धगधगते यज्ञकुंड (चार भाषांत अनुवाद), नाना शंकरशेठ, अनादि अनंत सावरकर नावात काय दडलंय, ठाणे नगरपालिका ते महापालिका ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. ठाण्यातील सेवाभावी संस्थांवरील पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
ठाणे भूषण, विविध संस्थांचे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ’काळ’कर्ते कै. शि.म. परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा कोकण विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, विश्वसंवाद केंद्रातर्फे नारद जयंती निमित्त दिला जाणारा ’उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यांनी ते सन्मानित होते.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. समस्त पत्रकारांचे ते महागुरु अशा श्री. वा. नेर्लेकर यांच्या निधनाने ठाण्याच्या सांस्कृतिक, राजकीय, पत्रकारिता आदि क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
579 total views, 1 views today