विद्यार्थी विना झालेल्या ध्वजारोहणाची खंत नेहमीच राहील


           
यावर्षी विद्यार्थी व पालकांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने कार्यक्रमाचा आनंद हवातसा घेता आला नाही . आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थी नसल्याने खंत वाटत होती. –  गुलाबराव पाटील

कल्याण :  १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशान्वये मर्यादित स्वरूपात स्वातंत्र्य दिन साजरा केला. पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात भारत चीन दरम्यानच्या सीमेवर तैनात असलेल्या
सैनिकांपैकी सम्राट अशोक विद्यालयाचा माजी विद्यार्थी सुदेश यादव सुट्टीत घरी आलेला असल्याने त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्था अध्यक्ष पी. टी. धनविजय , मुख्याध्यापक गुलाबराव पाटील , सुजाता नलावडे मॅडम तसेच काही प्रमाणात शिक्षक यांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. स्वप्नाली आव्हाड या विद्यार्थिनीने सिन्नर या तिच्या गावावरून व  अक्षदा सानप या विद्यार्थिनीने आपल्या घरूनच गुगल मीटच्या माध्यमातून  ऑनलाइन भाषण केले.
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम म्हटल्यावर सर्वत्र पंधरा दिवस आधी तयारीला सुरुवात होते. स्काऊट गाईड, आर एस पी, एम सी सीच्या परेड तसेच विविध कार्यक्रम यांमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. प्रभात फेरीमध्ये तिरंगा हातात घेऊन, वेगवेगळ्या घोषणांचा नारा देत स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटण्यात वेगळीच मजा असते.
परंतु यावर्षी विद्यार्थी व पालकांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने कार्यक्रमाचा आनंद हवातसा घेता आला नाही . आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थी नसल्याने खंत वाटत होती. असे मुख्यध्यापक गुलाबराव पाटील  यांनी सांगितले.
शाळेच्या काही  विद्यार्थ्यांनी  ऑनलाइन गुगल मीटच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शाळेने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची  ऑनलाइन आत्मनिर्भर- ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विषयावर निबंध स्पर्धा घेतली. कोरोनामुळे आपलं कर्तव्य बजावत असताना काही पोलीस, डॉक्टर , कामगार यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले.

 698 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.