आनंद परांजपे यांचा पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना वेग
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे सरचिटणीस तथा प्रवक्ता समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाणे आणि पालघरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
आनंद परांजपे यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाने आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता समन्वयक – ठाणे व पालघर जिल्हा या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून संघटनेत विविध जबाबदाऱ्या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच आपला राजीनामा स्वीकारावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
परांजपे हे गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग होता. प्रसारमाध्यमांशी संवाद, विविध आंदोलनांमध्ये सहभाग आणि स्थानिक राजकीय प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडण्यात ते आघाडीवर असायचे. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्याने पक्षात खळबळ उडाली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून आनंद परांजपे हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बदल, काही निर्णयांबाबतची नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशा चर्चांना आधीपासूनच उधाण आले होते. त्यातच मध्यंतरी ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्याने त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने आनंद परांजपे यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा संपर्क आणि प्रभाव असल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परांजपे हे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत प्रवेश करणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याबाबत अद्याप त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच त्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
455 total views, 2 views today