मुंडे स्पोर्ट्सला विजेतेपद

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला यशाचा मार्ग दाखवणाऱ्या मुंडे स्पोर्ट्सच्या आकाश पारकरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुंबई : छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना रंगतदार झालेल्या सामन्यात मुंडे स्पोर्टसने एसआरआय-डब्ल्यूआरएलपिबी संघाचा चार विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला यशाचा मार्ग दाखवणाऱ्या मुंडे स्पोर्ट्सच्या आकाश पारकरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंडे स्पोर्ट्सच्या आकाश पारकर, रितेश तिवारी आणि परिक्षित वळसंगकरने फलंदाजांना जखडून ठेवत एसआरआय-डब्ल्यूआरएलपिबी संघाला १४.२ षटकात फक्त ८६ धावांत गुंडाळले. कर्णधार विनायक भोईरने सर्वाधिक २३ धावा केल्या. ह्रितीक पाटीलने २२ आणि जिगर राणाने १४ धावा केल्या. आकाशने २१ धावांत ३, रितेश आणि परिक्षितने दोन विकेट्स मिळवल्या.
या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना परिक्षित वळसंगकर आणि आकाश पारकर या सलामीच्या जोडीने मुंडे स्पोर्ट्सला समाधानकारक सुरुवात करुन दिली. संघाच्या ३९ धावा झाल्या असताना तीन फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यामुळे मुंडे स्पोर्ट्स संघ अडचणीत आला होता. पण तळाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत १३.१ षटकात ६ बाद ८७ धावांसह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शशिकांत कदमने ३३, परिक्षित वळसंगकरने २३ आणि आकाश पारकरने १३ धावा केल्या. मुंडे स्पोर्ट्स संघावर दडपण आणताना सौरभ शर्माने १७ धावांत ४ विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : एसआरआय-डब्ल्यूआरएलपीबी : १४.२ षटकात सर्वबाद ८६ ( जिगर राणा १४, विनायक भोईर २३, ह्रितीक पाटील २२आकाश पारकर ३.२-२१-३, रितेश तिवारी २-१-९-२, परिक्षित वळसंगकर २-७-२, सूरज लालवानी ४-१९-१, वसंत मुंडे १-८-१) पराभुत विरुद्ध मुंडे स्पोर्ट्स : १३.१ षटकात ६ बाद ८७ ( परिक्षित वळसंगकर २३, आकाश पारकर १३,शशिकांत कदम ३३, सौरभ शर्मा ४-१७-४, अक्षद रेडकर ४-२०-१, विग्नेश साखळमोडे २-२४-१).
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आकाश पारकर.
सर्वोत्तम फलंदाज : अजित यादव.
सर्वोत्तम गोलंदाज : आकाश पारकर.
सर्वोत्तम क्षेत्ररक्षण : दीपक जैस्वार.

 191 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.