अटीतटीच्या लढतीत डी. वाय. पाटील बी संघावर केली एका धावेची मात
नवी मुंबई : डी. वाय. पाटील टी – २० क्रिकेट चषक रिलायन्स संघाने जिंकला आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीतील सामन्यांमध्ये रिलायन्स संघाने प्रथम फलंदाजी करून १५३ धावा काढल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डी. वाय. पाटील बी संघ १५२ धावा काढून सर्व बाद झाला. शेवटच्या षटकात दोन विकेट पडल्यामुळे डी. वाय. पाटील संघाच्या हातून चषक निसटून गेला.
डी. वाय. पाटील क्रीडा संकुलाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या डी. वाय. पाटील टी – २० क्रिकेट चषकामध्ये यंदा १६ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी आठ संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले. त्यानंतर उपांत्य फेरी डी. वाय. पाटील ए आणि रिलायन्स, डी. वाय. पाटील बी आणि टाटा स्पोर्ट या संघांमध्ये खेळली गेली. डी. वाय. पाटील बी आणि रिलायन्स हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले. काल हा अंतिम सामना नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. सुरुवातीला रिलायन्स संघाने फलंदाजी करून १५३ धावा काढल्या. हृतिक शोकिन याने ३४ चेंडूमध्ये ५३ धावा झळकावून रिलायन्स संघासाठी भरीव कामगिरी केली. डी. वाय. पाटील बी संघाची धुमधडाक्यात सुरुवात झाली. हार्दिक तामोरे याने ३४ चेंडूमध्ये ४३ धावा काढल्या. १९ षटकांपर्यंत हा सामना डी. वाय. पाटील बी संघाच्या आवाक्यात होता. मात्र शेवटच्या षटकामध्ये दोन विकेट गेल्या आणि सर्व संघ १५२ धावा काढून पूर्ण बाद झाला.
बक्षीस वितरण समारंभ डी. वाय. पाटील क्रीडा संकुलाचे अध्यक्ष विजय पाटील आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्या उपस्थित पार पडला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, मिलिंद नार्वेकर, संजय नाईक, अजिंक्य नायक, दीपक पाटील, अरमान मलिक, अमरदीप सिंग आदी उपस्थित होते. रिलायन्सचा हृतिक शोकिन याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी सुमारे २० हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते.
220 total views, 1 views today