शनिवारी भोगीच्या दिवशी सहयोग मंदिराच्या सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेमुळे भावगीत, भक्तीगीत,गझल आणि नाट्यसंगीताची वेगळीच मेजवानी मिळाली.
ठाणे : स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या गायन स्पर्धेत १५ ते ३० वर्ष वयोगटात मेहेक शेख तर खुल्या गटात चंद्रशेखर जगताप व्हॉइस ऑफ ठाणे पुरस्काराचे मानकरी ठरले. रोटरी क्लब ऑफ ठाणे अँजेल्स तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी भोगीच्या दिवशी सहयोग मंदिराच्या सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेमुळे भावगीत, भक्तीगीत,गझल आणि नाट्यसंगीताची वेगळीच मेजवानी मिळाली. १५ ते ३० वर्ष वयोगटात मेहेकने ८० दशकात गाजलेल्या एक दुजे के लिए चित्रपटातील सोला बरस की बाली उमर को सलाम हे गाणं गात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर मन मंदिरा हे गाणं गाणाऱ्या सोहम देशमुख या अंधगायकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अवघा रंग एकची झाला हे गीत सादर करणाऱ्या धनश्री काशीदला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
खुल्या गटात अपेक्षेप्रमाणे, आपल्या प्रियेला साद घालणारे माना हो तुम बेहद हंसी हे गाणं सादर करणाऱ्या चंद्रशेखर जगताप बाजी मारुन गेले. तर गम उठाने के लिए मै तो पिए हे दुःख व्यक्त गीत गात ललित मेहता यांनी अनेकांच्या वेदनेला हात घालत दुसरा क्रमांक मिळवला. तर जिया लागे ना गाणारी शलाका कोळी तिसऱ्या स्थानी राहिली. दिवसभर एकापेक्षा एक गाण्यांची मेजवानी देणाऱ्या या स्पर्धेत ८० हून अधिक गायक स्पर्धक सहभागी झाले होते. १५ ते ३० वर्षे वयोगटात सर्वस्वी राजदीपक कुमार, इशा कुलकर्णी, अनन्या नाईक, नीरजा पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर खुल्या गटात अदिती केतकर, रामदास यादव, मंदार जोशी, उन्मेष चंदावरकर, मनीषा लांबे आणि गिता चाफेकर उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरले. सर्वस्वी श्रुती विश्वकर्मा-मराठे आणि सुनीता सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जेष्ठ शास्त्रीय गायक पंडित संजय मराठे, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलास जेठानी, रोटरी क्लब ऑफ ठाणे अँजेल्सचे अध्यक्ष डॉ रत्नाकर कोयंडे, स्पर्धेचे समनव्यक अनिरुद्ध नाखवा आदींच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
33,678 total views, 2 views today