बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा कारनामा
उल्हासनगर : बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेतील महिला मॅनेजरने दोन साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करून पॉलिसी धारक पती पत्नीच्या नावाने असलेल्या जीवन विमा पॉलिसीचे ४६ लाख ६१ हजार २५२ रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत महिला मॅनेजरसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मिनु पंकज झा, (वय ३२, रा. आसनगाव, शहापुर) असे अटक महिला मॅनेजरचे नाव आहे. तर विकास रामुप्रसाद गोंड, (वय २५, रा. पिसवली, कल्याण), अनुज गुरूनाथ मढवी (वय ३०, रा. घोडबंदर रोड, ठाणे) असे अटक केलेल्या दोघांचे नावे आहे.
आसान बालानी यांचे उल्हासनगरमध्ये हॉटेल असून त्यांनी त्यांची आणि पत्नी पूजा बालानी अशा दोघांच्या नावाने बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. २०३० मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी ४६ लाख ६१ हजार रुपये मिळणार होते. त्यातच मार्च महिन्यात बजाज अलायंझ कंपनीची एक कर्मचारी आसान बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. त्यानंतर आसान बालानी यांना त्या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसान बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुनी जीवन विमा योजना सरेंडर करण्याची मागणी केली. त्याला आसान यांनी विरोध केला.
विरोध असूनही त्या दिवशी महिलेने जुनी विमा पॉलिसी रद्द करून नवीन जीवन विमा काढला. त्यानंतर तात्काळ आसान बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. २०२० मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसान बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात आरोपी मॅनेजर मिनू झा हिने तिचा मोबाईल नंबर टाकला. तसेच फोटो ही बदलला. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कममधून वळते केले होते. हा प्रकार आसान बालानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब विमा कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
आसान बालानी यांच्या समंती शिवाय पॉलीसी ब्रेक करून पॉलीसी सिस्टीम मधील त्यांचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी चेंज करून त्यामध्ये आरोपी मॅनेजर मिनू झा हिने स्वतः चा मोबाईल नंबर व ईमेल आयडी समाविष्ट करून त्याव्दारे ओटीपी घेवून आरोपी साथीदार विकास गोंड यांचेकडुन आसान यांच्या नावाचे बनावट लाईट बिल, वाहन चालक परवाना, बनावट चेक तयार करून घेवून दोन नवीन पॉलीसी काढल्या. त्यानंतर दोन्ही नवीन पॉलीसी ऑनलाईन व्हिडीओ व्हेरीफिकेशन करीता आसान यांचा मुलगा निरज बलानी याचे ऐवजी दुसरा आरोपी साथीदार अनुज मढवी याला उभे करून आसान व त्यांचा मुलगा निरज यांच्या खोटया सहया करून त्यांची आर्थिक नुकसान केली.
181,772 total views, 3 views today