कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर चीनसह अन्य ९ देशांतून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी

आतापर्यंत ४८ हजार प्रवाशांची तपासणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग शक्यतेवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४८ हजार २९५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान या देशांसोबत नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांतील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येणार आहे. राज्यात सध्या 3 जण मुंबई येथे भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 291 प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ८३ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ८३ प्रवाशांपैकी ८० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३ जण मुंबईतील रुग्णालयात दाखल आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २९१ प्रवाशांपैकी २०७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 495 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.