बदलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरने विजयी हॅटट्रिकसह उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेला तिसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद लाभला. विदयुत प्रकाशझोतात रंगलेल्या स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलीच्या गटात मुंबईने सलग तिसरा विजय संपादन केला. शेवटच्या साखळी लढतीत मुंबईने लातूर विभागाचा २५-१४, २५-११ गुणांनी पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत गटात अव्वल ठरलेल्या मुंबईची नागपूरशी लढत रंगणार आहे. या गटातील दुसरी उपांत्य लढत नाशिक विरूध्द पुणे विभागात होईल. गतविजेत्या नाशिक संघानेही ३ सामने जिंकून विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.
२१ वर्षांखालील मुलाच्या गटात गतविजेत्या लातूरने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. कोल्हापूर, संभाजीनगर पाठोपाठ अमरावतीला लोळवून लातूर गटात अव्वल ठरला. अटीतटीच्या तिसऱ्या साखळी सामन्यात लातूरने अमरावतीला २५-२०, २५-२१ गुणांनी पराभव करीत आव्हाप संपुष्टात आणले. लातूरकडून शेहराज शेख, आफताब कुरेशी, निर्भय देशमुख यांनी आक्रमक खेळ करीत मैदान गाजवले. लातूरची उपांत्य फेरीत नागपूर विरूध्द आमनासामना होईल.
मुलांच्या १८ वर्षांखालील गटात नागपूरने मुंबईला तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारली. तिसऱ्या साखळी लढतीत पहिला सेट नागपूरने गमवला होता. दुसऱ्या सेटमध्ये तुफानी खेळ करीत विजय खेचून आणला. २४-२५, २५-२१, १५-१० गुणांनी नागपूरने मुंबईचे उपांत्य फेरीतील स्वप्न धुळीस मिळवले. वत्सल्य किरटकर, कृष्णा तडसे यांच्या स्मॅशेसच्या जोरावर नागपूरने विजयी हॅटट्रिकचा पल्ला सर केला. उपांत्य फेरीत नागपूरची पुणे विरूध्द झुंज होईल.
मुलीच्या १८ वर्षांखालील गटात पुणे संघाने गटात अव्वल स्थान प्राप्त केले. तिसऱ्या साखळी लढतीत नागपूरचा २५-११, २५-७ गुणांनी धुव्वा उडवित उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुणे संघातील साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे हीने लक्षवेधी खेळ करीत नागपूरला पराभूत केले. गतविजेत्या लातूर संघाने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात पराभवानंतर तिसरा साखळी सामना जिंकत उपांत्य फेरीचा पल्ला पार केला. उपांत्य फेरीत पुणे विरूध्द लातूर ही एक चुरशीची लढत रंगणार आहे.
उपांत्य लढती
२१ वर्षांखालील मुले 1)लातूर विरुद्ध नागपूर , २. मुंबई विरुद्ध कोल्हापूर
२१ वर्षांखालील मुली १. नाशिक विरुद्ध पुणे, २. मुंबई विरुद्ध नागपूर
१८ वर्षांखालील मुले १. लातूर विरुद्ध कोल्हापूर , २. नागपुर विरुद्ध पुणे
१८ वर्षांखालील मुली १. पुणे विरुद्ध लातूर, २. कोल्हापूर विरुद्ध नागपूर


290,521 total views, 4,920 views today