उद्या मुबंईत इंटकचे राज्यस्तरीय अधिवेशन

कामगारांचे विविध प्रश्न न्याय – हक्कासाठी धोरण ठरवणार – जयप्रकाश छाजेड


मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारांविरोधी धोरणामुळे कामगार चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून कामगारांच्या अनेक समस्या, कामगार कायद्यामध्ये कामगार विरोधी बदल, कंत्राटीकरण पध्दत, खाजगीकरण व बेरोजगारीचा प्रश्न या पार्श्वभूमीवर कामगारांच्या भविष्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी पुढील धोरण निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय संम्मेलन इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डाॅ.जी. संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच इतर जेष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालयासमोर मुंबई येथे मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. या राज्यस्तरीय संम्मेलनास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, कामगार मंत्री मा. ना. दिलीप वळसे-पाटील, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, परिवहन व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एकनाथराव गायकवाड आदी नेते उपस्थित राहणार आहेत.


प्रक्षिशित संघटक तयार करणार
केंद्र सरकारची धोरणे मालक धार्जिणे झालेली असताना कामगार चळवळी पुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. महाराष्ट्र इंटकच्या राज्यस्तरीय संम्मेलनात कामगार एकजुटीसाठी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी एल्गार पुकारण्यात येणार असून आगामी काळात कामगार चळवळीचे नेतृत्व अधिक गतीशील करण्यासाठी कार्यक्षम कार्यकत्यांची फौज उभी करण्यात येणार आहे. वर्षभरात कामगार प्रशिक्षणावर भर देऊन प्रशिक्षित संघटक तयार करण्यात येणार आहेत. देशभरातील विविध असंघटीत कामगार संघटनांना इंटकच्या छताखाली आणून त्याचे नेतृत्व करून या संघटनांची शक्ती वाढवावी लागेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाद्वारे अनेक उद्योग (ओला, ऊबेर, टॅक्सी चालक, झोमॅटी, स्वीगी, अमेझॉन इत्यादी) भरभराटीस आले आहेत. मात्र या क्षेत्रातील कामगारांना कोणतेही संरक्षण, लाभ मिळत नाहीत त्यामुळे कामगारांनाही संघटीत करणे आवश्यक आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटीत व आणि संघर्ष करा हाच मुलमंत्र घेऊन पुढे जाण्याचा निर्णय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेने घेतलेला असून त्याकरिता पढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे जयपकाश छाजेड यांनी सांगितले.
केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे. हे खासगीकरण जनहितविरोधी व सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणारे आहे.
यामुळे देशभरातील कोट्यवधी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक, सामाजिक शोषण सरकार बरोबरच भांडवलदार वर्ग करीत आहे. मोदी सरकारने कामगार क्षेत्रामध्ये नीम (NEEM) नावाची नवीन वर्गवारी तयार केली आहे. नीम वर्गवारीतून कंत्राटी पध्दतीने भरती झालेले शिकाऊ कामगार कामगारच राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. परंतु कामगारांना मात्र कोणतीही सेवा, सुविद्या, हक्क, सुरक्षा नियमानुसार मिळत नाही. शेतक-यांच्या व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना सुद्धा कामगार विरोधी धोरण आणले जात असून त्याविरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व केंद्रीय श्रमिक संघटना एकत्रित आल्या आहेत.


के. एच. दस्तुर यांना जीवनगौरव
कामगार चळवळीत संपूर्ण आयुष्यभर अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल तेल रसायन मजदुर ट्रस्ट तसेच पेट्रोलीयम व विविध क्षेत्रातील कामगारांचे जेष्ठ नेते के. एच. दस्तुर यांना महाराष्ट्र इंटकच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. .दैनिक सकाळच्या प्रशांत कांबळे यांना महाराष्ट्र इंटकच्या वतीने कामगार चळवळीस पुरक विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंटक संस्थापक महात्मा गांधी राज्यस्तरीय गौरव पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षापासून राज्यातील पाच पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सदर संम्मेलनास राज्यभरातून महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या संघटनांचे १५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.

 520 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.