मुंबई श्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना दत्तक घेणार

स्पार्टन न्यूट्रिशनची होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी शोध मोहिम


मुंबई :  काही खेळाडूंमध्ये शिखर सर करण्याची क्षमता असते, पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना मध्येच माघार घ्यावी लागते. अशाच प्रचंड गुणवत्तेच्या खेळाडूंना मदतीचा हात देण्यासाठी स्पार्टन न्यूट्रिशनने एक शोधमोहिम हाती घेतली असून येत्या स्पार्टन न्यूट्रिशन मुंबई श्री स्पर्धेत पाच गुणवत्तावान होतकरू खेळाडूंची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याची माहिती स्पार्टन न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा ऋषभ चोकसी यांनी दिली. चोकसी यांच्या घोषणेचे मुंबई शरीरसौष्ठवाने जोरदार स्वागत केले आहे. 
सध्या मुंबईमध्ये शरीरसौष्ठवाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. एखादी जिल्हास्तरीय स्पर्धा असली तरी शंभरपेक्षा अधिक पीळदार स्नायूंचे सौंदर्य मंचावर अवतरते. मुंबई श्रीसारख्या स्पर्धेत तर हा आकडा दोनशेच्या पलीकडे जातो. पण ही स्पर्धा खेळल्यानंतर अनेक खेळाडू पुढच्या स्पर्धांमध्ये दिसतच नाहीत. जे खेळाडू गायब होतात, त्यांची अनेक वैयक्तिक कारणे असतात. पण शरीरसौष्ठवाकडे पाठ करण्याचं सर्वात मोठं कारण असतं आर्थिक अडचण. त्यामुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची खरीखुरी श्रीमंती जगासमोर येण्याआधीच आर्थिक बाबींपुढे शरणागती पत्करते. याच गुणवत्तेला शोधण्यासाठी आम्ही मुंबई श्रीच्या मंचाची निवड केली असल्याचे ऋषभ चोकसी यांनी सांगितले.शरीरसौष्ठवासाठी लागणारा सकस आहार, न्यूट्रिशन्स आणि आर्थिक सहकार्य या तिन्ही पातळ्यावर आम्ही खेळाडूंना मदतीचा आधार देणार असल्याचे चोकसी म्हणाले.

उपक्रमाचे संघटनेकडून स्वागत
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर फिटनेस व शरीरसौष्ठव संघटनेच्या मार्गदर्शनाने आम्ही ही शोधमोहिम घेणार आहोत. या मोहिमेतून मुंबईलाच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताला शरीरसौष्ठवाचे हिरे शोधून देण्याचं कर्तव्य मुंबईच्या शरीरसौष्ठव संघटना पार पाडतील, असा दृढ विश्वास मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी बोलून दाखवला. तर बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर म्हणाले, स्पार्टन न्यूट्रिशनने शरीरसौष्ठवपटूंसाठी जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. त्यांच्या या शोधमोहिमेला संघटनेचे पूर्ण सहकार्य लाभेलच. या गुणवत्ता शोधमोहिमेत संघटना पूर्णपणे पारदर्शकपणे निवड करील, असेही खानविलकर न विसरता म्हणाले.

मेहनत करणाऱ्याला न्याय देणार
आगामी “स्पार्टन  न्यूट्रिशन मुंबई श्री” स्पर्धेत होतकरू खेळाडू हाच निकष लावला जाणार आहे. मग तो खेळाडू विजेता असो, गटविजेता असो किंवा गटातच बाद झालेला असो. ज्या खेळाडूंत शरीरसौष्ठवाबद्दल आत्मियता आहे आणि जो चमकदार कामगिरीसाठी जीवाचे रान करतोय, पण ऐनकेन कारणाने त्याची मेहनत तोकडी पडतेय, अशा खेळाडूंचीच निवड आम्ही करणार आहोत. शरीरसौष्ठवपटू म्हटला की तो सामान्य कुटुंबातलाच असतो. सामान्य कुटुंबातल्या खेळाडूंवर आर्थिक अडचणींचा डोंगर असतोच. आपला खेळही सामान्यांचाच आहे. त्यामुळे दोनशे खेळाडूंमधून फक्त पाच खेळाडूंची निवड करणे आमच्यासमोर एक मोठे आव्हानच आहे. पण हे आव्हान आम्ही पेलू. आम्ही निवडलेले खेळाडू नक्कीच हीरे असतील आणि त्या खेळाडूंची वर्षभरातील कामगिरी पाहून ऋषभ चोकसी पुढच्यावर्षी पाचऐवजी पंचवीस गुणवत्तावान होतकरू खेळाडूंची निवड करण्यास आम्हाला अभिमानाने सांगतील, असा विश्वासही संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत आणि सुनील शेगडे यांनी व्यक्त केला.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.