ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार


शिवसेनेच्या जिल्हा संघटिका आणि विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


नवी मुंबई : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटिका ऍडव्होकेट संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
कोपरखैरणे येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या या कार्यक्रमास माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक दशरथ भगत, माजी नगरसेवक अशोक पाटील, परिवहन समितीचे सदस्य ऍडव्होकेट जब्बार खान, दिनेश पारख, माजी नगरसेवक संपत शेवाळे, राजेश मढवी, निशांत भगत, विजय मिश्रा, सुदर्शन जिरगे, जयेश कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व शिवसैनिकांचे भाजपात स्वागत करून गणेश नाईक यांनी त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन देतानाच एकजुटीने भाजपासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. मागील वीस वर्षे नवी मुंबईकरांनी जो विश्वास दाखविलेला आहे आणि जे प्रेम आपल्यावर व्यक्त केले आहे ते कायम राहील यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया विभागप्रमुख सुकाळे यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असल्याचे सांगून जिल्हा संघटिका ऍडव्होकेट सावंत यांनी शिवसेनेमध्ये न्याय मिळाला नसल्याची खंत बोलून दाखवली. भारतीय जनता पक्षाचे विचार पटल्याने यापुढे नाईक यांच्या नेतृत्वाखाली  भाजपात जी जबाबदारी देण्यात येईल ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने मी आणि माझ्या सर्व महिला कार्यकर्त्या यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा संघटिका सावंत आणि विभागप्रमुख सुकाळे या दोन प्रमुख शिवसेनेच्या नेत्यांसह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्याने ऐरोली विभागामध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये या विभागातून भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक जिंकून येतील याची मला खात्री आहे, असा विश्‍वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे.
ऐरोली प्रभाग क्रमांक १८ आणि ऐरोली प्रभाग क्रमांक २१ मधील पूनम सुकाळे,  बाळू शिंदे, राजेंद्र नवगने, धनराज सोनवणे, महादेव बोबडे, मोहन सोमवंशी, सुनंदा भोर, शितल शिंदे , करुणा दळवी, हेमा सालियन, लतिका निकम, अरुण वाडेकर, निलेश आमले, रेणू यादव, जसविंदर सोहेल,राजश्री सांगळे, सुभाष पाटील इत्यादींसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

 638 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.