पाठ फिरवून सेल्फी घेण्यापेक्षा शिवमंदिराचा समोरून अभ्यास करावा

डॉ कुमुद कानिटकर यांचे आवाहन, अंबरनाथ नगरपालिकेकडून नागरी सत्कार


अंबरनाथ : शिलाहारकालिन शिवमंदिरासमोर पाठमोरे उभे राहून सेल्फी घेण्यापेक्षा नव्या पिढीने शिवमंदिराकडे तोंड करून या कला वैभवाचा आस्वाद घ्यावा, त्याचा अभ्यास करावा, असे आवाहन शिवमंदिराच्या अभ्यासिका डॉ कुमुद कानिटकर यांनी केले. अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते डॉ कुमुद कानिटकर यांचा नागरी सत्कार सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. कुमुद कानिटकर यांनी वरील आवाहन केले.

अंबरनाथ येथील शिलाहारकालिन शिवमंदिरावर गेली तीन दशके सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. कुमुद कानिटकर यांचा नागरी सत्कार प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात अंबरनाथ नगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते डॉ. कुमुद कानिटकर यांचा मानपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

अंबरनाथच्या या शिवमंदिराची माहिती लोकांना व्हावी यासाठी शहरातील शाळेचे विद्यार्थी पुढाकार घेत आहेत हि अभिमानाची व कौतुकाची बाब आहे. हे विद्यार्थी स्काऊट व गाईड चे विद्यार्थी असल्याने खऱ्या अर्थी ते गाईड असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपल्या भाषणात काढले.

कार्यक्रमाच्या आयोजक अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी आपल्या प्रस्तविकपर भाषणात या प्राचीन मंदिरासाठी सहकार्य करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जगदीश हाडप यांनी सूत्रसंचालन, मानपत्र वाचन गिरीश त्रिवेदी यांनी, आभार प्रदर्शन प्रशांत मोरे यांनी तर मृदूला जोशी यांनी डॉ. कुमुद कानिटकर यांची मुलाखत घेतली.

डॉ. कानिटकर यांनी सोप्या भाषेत सचित्र पद्धतीने शिवमंदिर उपस्थितांसमोर उलगडले. उत्तर कोकण शिलाहारकालिन असलेल्या या शिवमंदिराचे १९५१ ते १९५४ या कार्यकाळात एका जर्मन गणिततज्ञाने अंबरनाथच्या वास्तव्यात असताना छायाचित्र काढले होते. त्या छायाचित्रापासून सुरूवात करत डॉ. कानिटकर यांनी शिवमंदिरावर असलेले शिल्प, मुर्ती याची शास्त्रशुद्ध माहिती सांगितली. यावेळी बोलताना त्यांनी नव्या पिढीला मंदिराकडे पाठ करून सेल्फी काढण्यापेक्षा मंदिराकडे तोंड करून या कला वैभवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. शिवमंदिराचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गेल्या शंभर ते दिडशे वर्षात पर्यावरणात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे दगडांना क्षती पोहोचण्याची शक्यता अधिक असून त्यामुळे अशावेळी मंदिरावर चढू नये, मुर्तींवर पाण्याचा मारा जोरात करू नये, दूध टाकू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

इतिहासाचे विद्यार्थी असलेल्या जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही मंदिराच्या कला वैभवाबद्दल कौतुक केले. मंदिर सुस्थितीत असले तरी त्यात अपेक्षित बदल झाले नाहीत. त्यामुळे लवकरच त्याचा प्रकल्प आराखडा सादर केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. कानिटकरांच्या कार्याचेही कौतुक त्यांनी यावेळी केले. मंदिराच्या संवर्धनाची हीच खरी वेळ असून राज्याला कलेत रस असलेले मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री लाभले आहेत. त्यामुळे मंदिरात पुढच्यावेळी येण्यापूर्वी बदल झालेले असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्याची ओळख हि एखाद्या वास्तूने होत असते. ठाण्याची कोणत्या वास्तूने ओळख व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करण्यात आला. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनापूर्वी वारली पेंटिंग हि एक ओळख होत होती मात्र आता या पुढे अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराने जिल्ह्याची ओळख होईल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपल्या भाषणात सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत केले.

परशुराम धर्मा पाटील, विजय चाहु पाटील, सुरेश राजाराम पाटील, कैलास एकनाथ पाटील, राम भास्कर पाटील, विलास कृष्णा पाटील, रमेश गोविंद पाटील, दिनेश अनंता पाटील, प्रवीण जनार्दन पाटील, गुरुनाथ लक्ष्मण पाटील आदी पारंपरिक ग्रामस्थ पुजारी तसेच शिवमंदिराची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी विशेष अंक प्रकाशित करणारे प्रा. अरुण मैड, गिरीश वसंत त्रिवेदी आणि मनिषा गिरीश त्रिवेदी यांचा सत्कार यावेळी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तहसिलदार जयराज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा, उपमुख्याधिकारी अमित अहिरे, नगरसेवक एड. निखिल वाळेकर, रवी पाटील, रवी चाहू पाटील, मिलिंद गान, नगरसेविकाशशिकला दोरुगडे, हेरंब सेवा समितीच्या अध्यक्षा शीतल जोशी, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मालती पवार, चंदा गान, आरोग्य निरीक्षक सुरेश पाटील, सुहास सावंत इतिहास अभ्यासक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 357 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.